मागील महिन्यात काश्मीरची सफर करण्याचा योग आला. खूप वर्षांपासून काश्मीर बघण्याचे स्वप्न होते, ते अखेर पूर्ण झाले. काश्मीरच्या सृष्टी सौंदर्याबद्दल आत्तापर्यंत खूप लिहिलेले आहे. वाचकांनी वाचलेले आहे. काही सिनेमांमध्ये काश्मीरचे शूटिंग सुद्धा दिसलेले आहे. त्यामुळे, काय सृष्टीसौंदर्य बघायला मिळणार याचा अंदाज होता. निर्मळ पाण्याच्या नद्या, ओढे, उंचावर जाऊ तसतशी पहायला मिळणारी भव्य बर्फाच्छादित शिखरे, मनमोहक चिनार आणि देवदार सूचिपर्णी वृक्षांची जंगले, सफरचंदाच्या बागा, केशराची शेती, डोळ्यांना सुखावणारा हिरवागार प्रदेश आणि सुंदर काश्मिरी लोक. जादुई नगरीची सफरच जणू.
आज मात्र मी तेथे भेटलेल्या आतिथ्यशील आणि स्नेहशील काश्मिरी लोकांबद्दल लिहिणार आहे. प्रवासादरम्यान अनेक काश्मिरी लोकांशी संपर्क आला. बोलका स्वभाव असल्याने त्याच्याशी संवाद करता आला. तेथील आमचे कार ड्रायव्हर होते ओमार. अठ्ठावीस-तीस वर्षांचा तरुण. नम्र आणि काळजीवाहू. बराच प्रवास असल्याने त्याच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. प्रातिनिधिक रूपात काश्मिरी लोकाना जाणून घ्यायचा प्रयत्न करता आला. संवादातून माझ्याच लक्षात आले की या लोकांबद्दल बातम्या ऐकून, मीडियामुळे माझ्या मनात किती गैरसमज होते. काश्मीर मध्ये आलेल्या अतिथींना ही लोक खूप जपतात. खूप मान देतात. आम्हाला भेटलेले सर्व गाईड दिसायला हीरो पेक्षा कमी नव्हते परंतु आर्थिक परिस्थिती मात्र यथा तथाच होती. पण जिगर होती, आशावाद होता, कोणतीही कटुता आढळली नाही. आम्ही बेताब व्हॅलीला शुक्रवारी गेलो होतो तेव्हा दुपारी आमचा गाईड नमाज पढायला आम्हाला सांगून गेला होता.
आम्ही कुठेही गेलो की कहावाचा आग्रह व्हायचा. हर्बल, केसरयुक्त, बदाम, अक्रोड काप घातलेला एक प्रकारचा चहा म्हणजे कहावा. शिकाऱ्यात बसून कहावा पिण्याचा आनंद आगळाच.
काश्मीरमधील रमणीय प्रदेशात जाण्यासाठी, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी घोड्यावरुन पर्वत शिखरांवर जावे लागते. आपल्यासाठी ते फक्त साईटसिंग असते. मजा असते. खेळ असतो. दोन घोड्यांसोबत एक घोडेवाला असतो. तो आपल्या बरोबर चालत असतो. सोपे नसते त्या डोंगरातून, ओढ्यामधून, उंच, सखल भागातून पायी चालणे. पण ते आपल्याला धीर देत राहतात. घोड्याशी बोलत त्याला चालवत राहतात. या कामाचा त्यांचा पगार अगदीच तुटपुंजा असतो. म्हणून ते टीपची अपेक्षा करतात. आमच्या घोडेवालाच्या डोळ्यातील टीप मागतानाची लाचारी बघून मला खूप वाईट वाटले.
बर्फाच्या डोंगरावर जाताना घसरगाडीचा वापर केला जातो, स्नो गेम म्हणून. घसर गाडीला दोन दोरखंड बांधलेले असतात. मला घसर गाडीवर बसवले आणि दोन लोकांनी दोर ओढत ओढत डोंगराच्या वरच्या भागात नेले. माझ्यासोबत अनेक घसर गाड्या होत्या. म्हातारी माणसं दोरखंड ओढत होती. एवढ्या बर्फात सुद्धा त्यांना घाम आल्याचे मी पाहिले. त्यांची ही शारीरिक मेहनत बघून त्यांनी जी रक्कम सांगितली मी ती विना तक्रार दिली. कारण त्यांच्या कष्टाचा तो मोबदला होता.
काश्मिरी लोकांच्या प्रामाणिकपणाचा हृद्य अनुभव आला. एक दिवस आमचा मुक्काम पहेलगाम येथे होता. दुसऱ्या दिवशी चेक आउट करून आम्ही श्रीनगरला जाण्यासाठी निघालो. काही अंतरावर गेल्यावर हॉटेल मधून फोन आला की, माझी बांगडी विसरलेली आहे. बांगडी दिसायला जरी सोन्यासारखी होती, तरी ती खऱ्या सोन्याची नसून एक ग्रॅम गोल्डची होती. प्रवासात कशाला जोखीम म्हणून मी साधी बांगडी घातलेली होती. हॉटेल मॅनेजरनी माझी बांगडी कुरियर द्वारा आमच्या श्रीनगरच्या हॉटेलवर पाठवण्याची व्यवस्था केली. जोपर्यंत मला बांगडी मिळत नाही तोपर्यंत त्याचा फॉलोअप चालू होता. हा अनुभव आपल्याला खूप काही सांगून जातो. खरं म्हणजे मी त्या मॅनेजरला कधीही परत भेटेल असं नाही, त्या जागी मी परत कधी जाईन असं नाही, पण तरीही त्यानी प्रामाणिकपणे माझी बांगडी माझ्या पर्यन्त पोहचवण्यचे कष्ट घेतले.
काश्मीर मध्ये निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. काश्मिरी सामान्य जनता मात्र अभावाचे जीवन जगत आहे. हा विरोधाभास मनाला स्पर्श करून गेला म्हणून आज हे हितगुज.
गेली दहा वर्ष काश्मीर सफरी खूप कमी झाल्या होत्या. पर्यटक येत नव्हते. या वर्षी मात्र खूप हौशी पर्यटक आले. फक्त मे महिन्यात साधारणपणे सहा लाख पर्यटक आले असे मी वाचले होते. मोठ्या ताण-तणावा नंतर आता जम्मू-काश्मीर स्थिर होत आहे. बाकी भारतीयांप्रमाणे काश्मिरी जनता प्रगतीशील, शांत, आनंदी जीवनाची स्वप्ने बघत आहेत. आपण अधिकाधिक संख्येने काश्मीरला भेट देऊन त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
काश्मिरी स्थळांची पुलवामा, अनंतनाग ई. नावांना चिकटलेली नकारात्मक प्रसिद्धी मनातून खोडून काढायला हवी त्यासाठी या रम्य स्थळांना भेटी द्याव्या. तिथे सुंदर आठवणी निर्माण कराव्या. भरपूर फोटो काढावे. आणि या सर्व गोष्टी तेथील चांगले अनुभव आपल्या मित्रमंडळीना सांगावे. हे आपण त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो.